Nashik Lok Sabha 2024 | लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स वाढला आहे. कारण अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी नाशिक येथून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर Nashik Lok Sabha 2024|
काही दिवसापूर्वीही नाशिक लोकसभा मतदार संघ चर्चेत आला होता कारण, मुख्यमंत्री श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून शिंदे गटाच्या नेते, खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. मात्र भाजप पक्षामधून नेत्यांनी नाशिकमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवाय आता छगन भुजबळ देखील निवडणूक लढण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू झाल्याने शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नाशिकची जागा शिवसेनेला सोडावी आणि हेमंत गोडसे यांना पुन्हा उमदेवारी देण्याची मागणी केली.
भाजप कार्यकर्त्यांकडून नाराजी
तर नाशिकच्या भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदेंसह इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांनीही फडणवीसांची भेट घेऊन, भाजपचा उमेदवार देण्याची मागणी केली. सलग दोन टर्म भाजपच्या पाठिंब्याने गोडसे निवडून आलेत, असा दावा करत हेमंत गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर फडणवीस यांच्याकडे भाजप कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपावरुन सुरु असलेल्या विविध चर्चांमुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली आहे. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून वाद होण्याची शक्यता असताना नव्याने महायुतीत दाखल झालेल्या राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपाची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार का? हे पहावे लागणार आहे.
हेमंत गोडसे सलग दोन टर्म खासदार Nashik Lok Sabha 2024|
2014 च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा गोडसेंनी दारुण पराभव केला होता. हेमंत गोडसे यांना 4 लाख 94 हजार 735 मते मिळाली तर छगन भुजबळ यांना 3 लाख 7 हजार 399 मते मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी पुतण्या समीर भुजबळ यांचा पराभव करत नाशिकचे मैदान मारले होते. हेमंत गोडसे यांना 5 लाख 63 हजार 599 इतकी घवघवीत मते मिळाली होती. तर समीर भुजबळ यांच्या पारड्यात 2 लाख 71 हजार 395 मते पडली होती. गेल्या 10 वर्षांपासून नाशिक लोकसभेवर हेमंत गोडसे हे खासदार आहेत.
हेही वाचा: