पुणे : कोरोनामुळे घाला घातलेल्या जेजुरीमधल्या घोणे दाम्पत्याच्या दोन्ही मुलींचं पालकत्व आणि जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारले आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी घेतली अन् आई-वडिलांच्या मायेला मुकलेल्या या चिमुकल्यांनी जबाबदारी स्विकारली.
जेजुरीमधल्या घोणे कुटुंबातील दोन मुलींच्या आई-वडिलांचे करोनामुळे निधन झाले. साडे चार वर्ष आणि केवळ दीड वर्ष एवढ्या कोवळ्या वयाच्या मुलींवर ही दुःखद परिस्थिती ओढवली आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर दोघींचीही जबाबदारी वयोवृद्ध आजी-आजोबांवर आली. ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर या दोघींचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
” ही धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घेत या दोन्ही मुलींना मदत करणं हे कर्तव्य आहे. या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आमचं कुटुंब घेत आहे. जेजुरीतील आमचे सहकारी दिलीपदादा बारभाई तातडीने कोणालातरी तिथे पाठवत आहेत. पाठपुरावा करुन त्यांच्या आजी-आजोबांना कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत.” अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली.
“मी याबाबत सरकार, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक लोकप्रतिधीने आपापल्या मतदारसंघात जमेल तशी जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने आपली वेळ जरी दिली तरी त्यांना आधार मिळेल,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.