दीड दशकापूर्वी पॉप जगतात ब्रिटनी स्पियर्स नावाचे वादळ घोंगावत होते. मायकेल जॅक्सन, मॅडोना यांचा एक काळ होता. त्यांच्या हयातीतच ब्रिटनीचा उदय झाला होता. पाहता पाहता तिने सगळे जग व्यापून टाकले होते.
तिची काया, तिचा बांधा, तिचे नृत्य यामुळे लाखो लोकांना घायाळ केले होते. सगळीकडे ब्रिटनीचा बोलबाला होता.
पण लहान वयात अमाप प्रसिद्धी, प्रचंड पैसा आणि यश मिळाले की ते सांभाळले गेले नाही किंवा सांभाळता आले नाही की प्रश्न जटील होत जातात. यथावकाश ब्रिटनीच्या बाबतीत तेच झाले आणि ती कोणी आठवण काढण्याची शक्यता नाही अशा अंधरात गुडूप झाली.
आता पुन्हा ब्रिटनीचा आवाज आला आहे. ते कोणत्या अल्बममधून नाही तर तिने केलेल्या स्वातंत्र्याच्या मागणीमुळे. ती कोणता स्वातंत्र्यलढा लढत नाहीये. तिला तिचे स्वत:चे स्वातंत्र्य हवे आहे. आपले आयुष्य आपल्याला जगू द्यावे. आपले निर्णय आपल्याला घेऊ दिले जावेत. त्याकरता आपल्यावर असलेली कंझरवेटीवशीप रद्द केली जावी अशी विनंती तिने न्यायालयाला केली आहे.
ब्रिटनीची स्थिती ठीक नसल्यामुळे तिच्या पित्याला जेमी स्पीयर्सला न्यायालयाने कायद्याने ब्रिटनीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. तिचे आयुष्य कसे असावे आणि सगळे आर्थिक निर्णय तिचा पिताच घेत आहे.
ते आता तिला नको आहे. आपण आपले निर्णय घेऊ शकतो. आपल्याला लग्न करायचे आहे, आई व्हायचे आहे त्यामुळे आपल्याला या बंधनातून मुक्त केले जावे, अशी मागणी तिने केली आहे.