– संगीता पाचंगे
शोभा जगताप यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात 1990 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षापासून केली. आपल्या गुरू डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, मुलींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत त्यांना न्याय देण्यसाठी त्या लढत आहेत. याबरोबरच महिलांचे सबलीकरण व्हावे. यासाठी त्यांनी स्वाभिमान नावाचा बचत गट स्थापन करुन त्यांना रोजगार मिळवून दिला. याप्रकारचे त्यांनी 6 महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. यामाध्यमातून महिलांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. तसेच, ज्या महिलांना कोणी वाली नाही अशांना न्यायव्यवस्थेकडून स्वखर्चाने न्याय मिळवून दिला आहे.
आपले घर सांभाळत शोभा जगताप यांनी स्त्री-आधार केंद्रामार्फत शेकडो स्त्रियांचे प्रश्न सोडविले आहेत. तर, ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामपंचायत कामकाजाचे प्रशिक्षण देत माहिती दिली आहे. त्या सांगतात की, अलीकडच्या काळात घटस्फोट होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. माणसाने शिक्षण घेतले म्हणून माणूस मोठा होत नाही. तर, चांगल्या तो विचाराने मोठा होत असतो. त्यामुळे आपल्या चांगल्या वर्तनात बदल करायला हवे, असा सल्ला देखील त्या तरुणांना देतात.
ज्या महिलांना त्यांच्या पतीने सोडले, त्या महिलांच्या पोटगीसाठी त्या झटतात व त्यांना न्याय मिळवून देत त्यांच्या आयुष्याला सावरण्याचे मोलाचे कार्य जगताप करतात. तर, अनेकांचे उद्ध्वस्त होत असलेले संसार शोभा जगताप यांनी मार्गदर्शनाने सोडविले आहेत. वय वाढत असले आणि प्रकृती साथ देत नसली तरी, त्या सामाजिक कार्यात स्वत;ला झोकून देतात.
त्यांचा हा उत्साह तरुणांना सुद्धा लाजवेल असा आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना रमाई महिला पुरस्कार, रमाईची लेक, भिमाई माता, पृथ्वी राज साठे पुरस्कार, संघमित्र पुरस्कार व विविध सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार असे एकूण 25 पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत. याच बरोबर पोलीस महिला संघटना, महिला दक्षता कमिटी स्थापन करुन या मार्फत अनेक महिलांना न्याय मिळवून देत आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या सहकारी सुरेखा काजरोळकर व सुष्मा वाघमारे या त्यांना मदत करीत आहेत.
सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबरच स्त्रियांना न्याय मिळवून देत शेकडो महिलांचे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला योग्य मार्गदर्शन करत परत संसाराचा गाडा सुरळीत करणाऱ्या पिंपळे निलखच्या रहिवासी असलेल्या 57 वर्षीय व फक्त इयता सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शोभा उर्फ नानी जगताप यांनी आपल्या सामाजिक कार्याने प्रभावित केले आहे. त्याच्या याच कार्याची पावती म्हणून त्यांना आजपर्यंत विविध क्षेत्रातील 25 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शोभा जगताप