हडपसरमधून बंडखोरी होण्याची शक्यता?
“कोणावर अन्याय होता कामा नये; परंतु आपल्याला न्याय मिळत नसेल तर संघर्ष करा,’ अशी शिकवण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली आहे. हीच शिकवण आत्मसात करून शहर शिवसेनेतील दोन शिवसैनिकांनी बंडखोरी करत गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. या दोन्ही उमेदवारांना शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शक्तिप्रदर्शनातून हा प्रतिसाद दिसून आला. परंतु, ही बंडखोरी काय राहणार का? उमेदवार माघार घेणार हे येत्या 7 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली. जागावाटपही झाले; परंतु शहरातील आठ पैकी एकही जागा शिवसेनेच्या वाटेला आली नाही. शहरात एक आणि ग्रामीणमध्ये एक अशा किमान 2 जागा शिवसेनेला सोडाव्यात, अशी मागणी शिवसेनेकडून भाजपकडे करण्यात आली.
मात्र, मित्र पक्षाने शिवसेनेला एकही जागा न सोडल्यामुळे शहर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि. 3) शिवसैनिकांनी आंदोलनही केले.
दरम्यान, खडकवासला, हडपसर आणि कसबा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून, किमान 2 जागा मिळणे अपेक्षीत होते; परंतु एकही जागा न मिळाल्यामुळे या मतदारसंघातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचे दंड थोपटले आहे. त्यामध्ये खडकवासल्यातून जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, कसबा मतदारसंघातून विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत गुरुवारी उमदेवारी अर्ज भरला.
तर हडपसरमधूनही बंडखोरी होण्याची शक्यता असून, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात आहे. ही बंडखोरी विद्यमान आमदारांना धक्का देणारी आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार माघार घेणार का? निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे लवकरच स्पष्ट होईल.