पुणे/कोथरुड – विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राज्यात पोषक वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमच्या 220 पेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि आमचे सरकार येईल, असा विश्वास कोथरूडमधील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व कर्वे पुतळा या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात केली. त्यानंतर कर्वे रस्त्यावरील जुन्या क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रॅलीमध्ये खासदार गिरीश बापट, माजी मंत्री शशिकांत सुतार, आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, शाम देशपांडे, उत्तम भेलके, कोथरुड मतदार संघातील भाजपचे नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्यभरात मागील 5 वर्षांच्या काळात भाजप आणि शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत.
त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदार संघातून मिळालेल्या मताधिक्यांपेक्षा अधिक मतांनी आपण निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान मनसेच्यावतीने किशोर शिंदे यांनी सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पण त्यांनी कुठल्याही प्रकारची रॅली न काढता स्वतःकाही मोजक्या कार्यकर्त्याबरोबर येऊन आपला अर्ज दाखल केला.