नवी दिल्ली : देशात रोजच वातावरण बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे पाऊस जास्त आहे तर कुठे उन्हाचा सध्या चटका जाणवत आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा असू शकेल. हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमने या चक्रीवादळाचा अंदाज वर्तवला होता. बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 5 मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची माहिती आयएमडीच्या वतीनं देण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, मध्यरात्रीनंतर 11 मे ते 13 मे दरम्यान चक्रीवादळ म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांगलादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या किनारपट्टीला 150 ते 180 किमी/ताशी वाऱ्याचा संभाव्य वेग आहे, पण तो भारताच्या ओदिशा राज्याच्या किनारपट्टीलाही धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा उगम झाल्यास त्याला ‘मोचा’ असे नाव देण्यात येईल. हे नाव यमनने दिले आहे.