‘कल‌ई’ची कला चालली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या या कलेविषयी सर्वकाही

– किरण देशमुख

खटाव (सातारा) – ‘डोक्याला कलई करू नकोस’ एवढीच म्हण नव्या पिढीने कदाचीत ऐकली असेल .’कलई ‘म्हणजे नक्की काय? हे आजच्या पिढीला बहुदा माहीत देखील नसेल. कलईची कला पारंपरिक व फार जुनी आहे. आजच्या पीढीला तर ती फारशी परिचित देखील नाही.

मानव सुरुवातीला मातीची भांडी वापरत असे कालांतराने विज्ञानाच्या आविष्कारामुळे त्याच्या राहणीमानामध्ये बदल जाणवू लागला व तो हळूहळू तांबे,पितळ व कासे अशा धातूंचा वापर करू लागला व हळूहळू मातीच्या भांड्याचा वापर कमी होऊ लागला.तांब्या व पितळेच्या भांड्यातील अन्नपदार्थ आरोग्यास लाभदायक असले तरी पदार्थ फार काळ त्या भांड्यामध्ये ठेवता येत नसे व अन्न आरोग्यवर्धक राहत नसे.या समस्येवर मानवाने मग पर्याय शोधला. तो पर्याय म्हणजेच कलई होय.

‌ तांब्या व पितळेच्या भांड्यांना कलई करणं अंत्यत आवश्यक असतं.आज हौस म्हणून अनेक जण ही भांडी वापरतात पण त्याची व्यवस्थित निगा राखली जात नाही.कलई करण्यासाठी कथिल व नवसागर फार आवश्यक असते.सध्या त्याच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत . माहिती घेतली असता साधारण कथिल हे ५००रू.५० ग्रॅम मिळते तर नवसागर हे २००रू.१०ग्रॅम या प्रमाणे उपलब्ध होते. कलई चे दर भांडे पाहून ठरविले जातात.

पितळ व तांब्याच्या भांड्यात प्रत्यक्ष पदार्थ बनवत असताना हे धातू अनेक क्षारांशी व आम्लाशी अभिक्रिया करतात व त्यातून जे क्षार निर्माण होतात ते पदार्थ आरोग्यास घातक ठरू शकतात. कथील हा धातू अन्नातील क्षारांशी व आम्लाशी अभिक्रिया करत नाही. त्यामुळे भांडे गरम करून कथिलाचा लेप दिला की ते भांडे अन्न शिजवायला एकदम सुरक्षित होते.

वास्तविक कथिल हे मनुष्यजातीला वरदानच ठरले आहे. तांब्या -पितळेला कथिलचा लेप देणे अतिशय सोपी प्रक्रिया आहे. पण कौशल्याचे देखील आहे त्यातच तासनतास आगीच्या भट्टी शेजारी बसावे लागत असत्यामुळे घातक देखील आहे.कलई करते समई भांडे कोळशाच्या छोट्या भट्टीवर चांगले गरम करून त्यावर नवसागर टाकून फडके फिरवले की त्याचा पृष्ठभाग चकचकीत व स्वच्छ होतो. नंतर त्यावर कथिलाची कांडी फिरवली की तो धातू वितळतो आणि परत एकदा वरून फडके फिरवले की भांड्यावर कथिलचा अतिशय पातळ थर पक्का बसतो.

साधारणपणे जुन्या काळी वर्षभर अन्न शिजवून, मातीने अथवा राखेने घासूनही तो निघत नसे. भांडं अगदी चांदी प्रमाणे लख्ख, पांढरा शुभ्र चकचकीत व नविनच भासते.अशी ही कलईची जादुई कला आहे.

पुरातन काळात शेकडो वर्षे आपण कलई केलेली भांडी वापरली आहेत. त्याआधी आपल्या वापरात मातीची भांडी होती.आता स्टेलनेस स्टील,नॉन स्टीकच्या जमान्यात तांब्या पितळेच्या भांड्या बरोबर कलईची कला देखील काळाच्या पडद्याआड जाऊ पहात आहे.कारण सध्या कलईला अधिक मागणी नसल्याने नविन कलाकार उदयास आलेच नाहीत.

काही निवडक व जूने -जानते हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कलाकार सध्या अस्तित्वात असल्याचे निदर्शनास येत आहे.सध्या खटाव परिसरात भिलवडी जि.सांगली येथील कलई व्यवसाया निमित्ताने वास्तव्यास असणारे दिलीप सुपनेकर व शिवाजी सुपनेकर या बंधुनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “एक काळ असा होता की आम्हांला कलई चे काम संपता- संपत नव्हते.आज मात्र गावोगावी घरोघरी फिरूनही पोटापुरता व्यवसाय मिळत नाही . हातात कला असुनही मग मोल – मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.त्यातच भरीस भर म्हणून की काय या जिवघेण्या आजाराने आमच्या व्यावसायाचे कंबरडेच मोडले आहे “.

आज असे अनेक व्यवसाय व कला आहेत की ज्या काळाच्या पडद्याआड जात आहेत . फक्त व्यवसायच व कलाच नव्हे तर त्या कलाकाराचे अस्तित्वच संपुष्टात येत आहे. आणि मग प्रश्न उपस्थित होतोय तो त्याच्या गुजरानीचा अर्थातच उदरनिर्वाहाचा. शासन स्तरावरून अशा लोकांना मदतीचा हात मिळाला तर त्यांचे जीवन नक्कीच सुसह्य होईल व उतारवयात पोटाची खळगी भरण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबण्यास काही प्रमाणात मदतच होईल.आवश्यकता आहे शासनाने अशा अस्तास चाललेल्या कलेस व कलाकारास नव्याने उभारी देण्याची.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.