भंडारा – मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटायाला जाताना ट्रेलरच्या धडकेत वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथे शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. दिलीराम कवडू वाघाये (वय 50, रा. केसलवाडा वाघ) असे मृताचे नाव आहे.
दिलीराम यांच्या मुलीचे 21 एप्रिल रोजी लग्न आहे. त्यासाठी दिलीराम हे नातेवाईकांना लग्नपत्रिका वाटण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. राष्ट्रीय महामार्गावर केसलवाडा फाट्यावर लाखनीकडे वळण घेत असताना भरधाव ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दिलीराम यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी संगिता गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी संगीता यांच्यावर भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.