पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार चौरस फूट आकाराच्या अनधिकृत निवासी बांधकामांवरील शास्तीकर 100 टक्के माफ केला आहे. तर, 1 हजार 1 ते 2 हजार फूट आकाराच्या मालमत्तेवरील शास्तीकर 50 टक्के माफ करण्यात आला आहे. ज्यांनी शास्तीकर भरला आहे, त्यांचे पुढील बिलात ती रक्कम समायोजित केली जाणार आहे, असे कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.
शहरातील 500 चौरस फुट अनधिकृत निवासी घरांना 100 टक्के शास्तीकर माफी दिली. त्यानंतर 501 ते 1 हजार चौरस फुटांच्या अनधिकृत घरांना ही 100 टक्के शास्तीकर माफ झाला. तर, 1 हजार 1 ते 2 हजार चौरस फुटांच्या अनधिकृत घरांना 50 टक्के शास्तीकर माफ करण्यात आला आहे. या सदंर्भात महापौर माई ढोरे यांनी तक्रार केली होती.
स्मिता झगडे म्हणाल्या की, एक हजार चौरस फूट अनधिकृत घरांचा शास्तीकर 54 हजार नागरिकांनी भरला आहे. तर, 1 हजार 1 ते 2 हजार चौरस फूट अनधिकृत घर असलेल्या 15 हजार जणांनी शास्तीकरासह बिल जमा केले आहे. शास्तीकराची रक्कम पुढील बिलात समायोजित केली जाणार आहे. त्यांची कार्यवाही या महिन्यांच्या अखेरीस संपेल. त्यानुसार नव्याने बिले दिली जाणार आहेत.