- नवीन 167 रुग्णांची नोंद : 5 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील आठवड्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी झाली होती. मात्र त्यामध्ये पुन्हा हळूहळू वाढ होत आहे. आज शहरामध्ये 167 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 5 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 97790 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 167 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये हळूहळू रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. शुक्रवारी (दि.1) शहरामध्ये 120 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि. 4) रुग्णसंख्या शंभरीच्या आत येऊन 75 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या दीडशेच्या वर येत आहे.
आज पुन्हा 167 रुग्णांची नोंद झाल्याने एकूण करोनाबाधित रुग्णांची नोंद 97 हजार 790 इतकी झाली आहे. तसेच आज दिवसभरात शहरातील 5 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील एकाचा समावेश आहे. शहरातील पिंपळे गुरव, भोसरी, नेहरुनगर व दापोडी येथील 4 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील जुन्नर येथील 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आजपर्यंत 2508 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1772 तर शहराबाहेरील 736 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 158 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 94316 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2843 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 3094 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 573 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 1129 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1702 इतकी आहे.