प्रशासनानेच काठी उगारण्याची गरज…

उपनगर वार्तापत्र कोंढवा : महादेव जाधव

करोना विषाणुंचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून निर्बंध घातले जात आहेत. कोंढवा उपनगरांत मात्र याबाबत फारसे गांभीर्य दिसत नाही. कोंढवा परिसरात रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असताना कोंढवा भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील अनेक हॉटेल्स, टपऱ्या व चौकाचौकात अद्यापही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने करोनाविरुध्द लढण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. काठी उगारण्याचीच गरज आहे.

कोंढवा परिसरात पोलीस व पालिका प्रशासनानेच जमावबंदी व रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मोठ्या लोकसंख्येच्या कोंढवाखुर्द, मिठानगर, शिवनेरीनगर, कोंढवा बुद्रुक, ज्योती चौक, लुल्लानगर चौक, भाग्योदयनगर, उंड्री, पिसोळी आदी भागात गर्दी कायम आहे.

करोनाच्या पार्श्‍वभुमीवर सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र, या भागात कोणी फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. शाळा, कॉलेज व खासगी कार्यालये बंद असल्याने ही सुट्टी मौजमजेसाठीच घालविली जात आहे. अनेकजण रस्त्यांवर चौकाचौकात, हॉटेल्स, टपऱ्यांवर जागोजागी गर्दी करीत असल्याचे सर्रास पहायला मिळते.

कोंढवा भागातील काही व्यावसायिकांसह बहुतांश छोटे-मोठी दुकाने सर्रास सुरू आहेत, सर्वत्र मोठी वर्दळ आहे. हॉटेल्स बंद करण्याचे आदेश असतानाही अनेक हॉटेल्स रात्री उशीरा पर्यंत सुरू असतात. त्यामुळे आता संबंधित प्रशसानालाच पुन्हा एकदा कडक पाऊले उचलवी लागणार आहेत.

महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्यविभाग करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवत असताना कोंढव्यातील नागरिक मात्र सर्व नियम बासनात गुंडाळून वागत आहे. काही नागरीक मात्र मोठ्या गांभीर्याने घराचा उंबरठाही ओलांडत नसताना अनेकजण मात्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन धुम्रपान, पीकपान करून थुंकताना दिसत आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्यांमध्ये शिक्षित नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

काही दिडशहाणे आता लस आली आहे, आपल्याला काही होत नाही या आविर्भात वावरत आहेत. पोलीस यंत्रणेने संचारबंदी व जमावबंदी अंमलात आणून कोंढवा उपनगरातील गर्दी रोखणे गरजेचे आहे. कोंढव्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असून या धक्कयातून अनेक कुटुबे सावरत नाहीत तोच करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे शासकिय नियमांचे पालन न केल्यास कोंढवा उपनगरांत परीस्थिती गंभीर होऊ शकते, अशी चिंता जाणकार मंडळींनी व्यक्त करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.