कराड -सातारा जिल्ह्यात करोना बाधितांचे आगार ठरलेल्या वनवासमाची, ता. कराड येथील दोन करोना पॉझिटिव्ह रूग्ण व एक क्वारंटाइन महिला असे तीनजण दि. 8 मे रोजी करोनामुक्त झाले. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेमुळे त्यांचे गाव पातळीवर स्वागतच झाले नाही. करोनामुक्त रूग्ण गावात आणले जाणार आहेत याची कल्पना ना ग्रामपंचायतीला होती ना येथील आरोग्य विभागाला. वास्तविक पाहता त्यांचे गावपातळीवरील स्वागत म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर करोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह गावातील अन्य क्वारंटाईन लोकांना ऊर्जा देणारे असे ठरले असते. मात्र, वनवासमाचीबाबत प्रशासन एवढे उदासिन का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वनवासमाचीतील करोना बाधितांचा आकडा 36 आहे. या वाढत्या संक्रमनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य विभाग जीव ओतून काम करत आहे. येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी क्वारंटाईन असल्याने ग्रामसेविका जाधवर अन्य यंत्रणेच्या माध्यमातून र्निजंतुकीकरणाचे काम करत आहेत. दि. 21 एप्रिलपासून वनवासमाची येथे सुरू झालेली करोना बाधितांची साखळी गेल्या चार दिवसात आरोग्य व तालुका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
येथील वाढत्या रूग्णांचा करोना बाधित साखळीचा माग काढण्यात उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय कुंभार व त्यांच्या टीमला यश आले आहे. यात तलाठी, ग्रामसेविका, आरोग्य विभागाच्या परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वकर्स यांचे प्रत्यक्ष काम महत्वाचे ठरले आहे. वनवासमाची, खोडशी, उंब्रज, चरेगाव येथील करोनाबाधित रूग्णांच्या निकट सहवासातील लोकांना क्वारंटाइन करणे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणे, लो रिस्क असलेल्या लोकांना होम क्वारंटाईन केल्याने वनवासमाचीच्या वाढत्या साखळीला ब्रेक लागला आहे.
दि. 8 मे रोजी वनवासमाची येथील दोन पॉझिटिव्ह करोना रूग्णासह एक क्वारंटाईन महिला करोनामुक्त झाली. डेरवण, चरेगाव आदी गावात करोनामुक्त रूग्णांचे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर ज्या वनवासमाची गावातून करोनाचा आकडा वाढला त्या गावातील पहिले तीन रूग्ण बरे होऊन घरी परत येत आहेत याची साधी कल्पनाही स्थानिक ग्रामपंचायत अथवा आरोग्य विभागाला देण्यात आली नाही. उलट कृष्णा हॉस्पिटलमधून करोनामुक्त रूग्णांना घेऊन आलेली रूग्णवाहिका थेट रूग्णांना त्यांच्या घरी सोडून निघून गेली.