कोपर्डे हवेली -साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात वर्षभर पुरेसे उन्हाळी पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असते. कामानिमित्त पुणे-मुंबई स्थित असणाऱ्या महिला देखील यावेळी गावाकडेच असल्याने घरातील सर्व महिला मिळून उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. युवतींनी यु-ट्यूबचा सकारात्मक वापर करून विविध रेसीपी बनविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. एकिकडे रेसीपीचा आनंद तर शेवया व मागणीप्रमाणे पदार्थ बनविणाऱ्या महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाची सोय होत आहे. लॉकडाऊनने सगळ्यांनाच लॉकअप म्हणजे बंदीवासात टाकले आहे. पण मिळालेला वेळ सत्कारणी लावण्यात महिलावर्ग मात्र आघाडीवर आहे.
उन्हाळा म्हणजे शेवया, वेफर्स, कुरडया, सांडगे, उडीद तसेच विविध पापड बनविण्याची जणू महिलांच्यात स्पर्धाच असते. अनेकजण त्यामध्ये विविध रंगाची उधळण करतात त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रध्वजाच्या रंगाना प्राधान्य दिले जाते. केशरी, पांढरा व हिरव्या रंगातील कुरडया पाहून त्यातून राष्ट्रप्रेम दिसून येते.
रोजच्या संसाराच्या गाड्यातून वेळ काढून जिभेचे लाड पुरविण्यासाठी महिला नेहमीच तत्पर असतात. यात लहानग्यांची लुडबुड अन् शेजारणींचा पैरा सर्वत्र दिसतो. चवदार पदार्थ बनविणाऱ्या महिला यावेळी वॉन्टेड असतात. तसेच युवती यु-ट्यूबचा सकारात्मक वापर करताना दिसत आहेत. खाद्यपदार्थ बनविण्याचा व्हिडिओ शोधून त्यासाठी लागणारे घटक पदार्थ जमविताना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. घरोघरी सर्रास जणू चढाओढ असल्याने बाजारपेठेत रेसीपीसाठी लागणाऱ्या पदार्थांचा तुटवडा भासत आहे.
केक, पाव यांसारखे बेकरी पदार्थ कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यात श्वसन संस्थेचा संसर्ग टाळण्यासाठी केक, आईसक्रीमसारख्या थंड पदार्थांना दुय्यम मागणी आहे. पाणीपुरी, वडापाव, बिस्किटापासून केक आदींसारखे पदार्थ बनवण्यावर भर दिला जात आहे. लॉकडाऊनमध्ये बच्चे कंपनी घरीच असल्याने निम्मेअर्धे पदार्थ महिन्याभरात संपल्याने पुन्हा ते पदार्थ करण्यात महिला व्यस्त आहेत.