एकही आमदार नसतांना शिवसेनेला मिळणार 25 टक्के समित्या
नगर – जिल्हा व तालुकास्तरावरील विविध समित्यांसाठी महाविकास आघाडीत 40-60 चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. ज्या पक्षाचा पालकमंत्री असेल त्या पक्षाला जिल्हास्तरावरील 40 समित्यांमध्ये जागा तर अन्य दोन पक्षाला प्रत्येकी 30 टक्के जागा देण्याचे ठरले आहे.
तालुकास्तरावर ज्या पक्षाचा आमदार असले त्या पक्षाला 50 टक्के जागा देवून उर्वरित दोन पक्षांना प्रत्येकी 25 टक्के जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत या फॉर्म्युलानुसार जागा ठरल्या असून त्या 15 दिवसात जिल्हाध्यक्षांनी समित्यांसाठी सदस्यांची यादी पाठविण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिली आहे.
ना. मुश्रीफ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळूके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, माजी आमदार चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्हा व तालुकास्तरीय समित्यांची येत्या 15 दिवसात नियुक्त करण्यात येणार आहे. महामंडळासह विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अद्याप धोरण ठरले नाही. त्यामुळे या निवडी सध्या तरी होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. आता केवळ समित्याच्या नियुक्त्या होणार आहे. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत समित्यांसाठी फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षामध्ये समित्यांचे जागा वाटप केले जाणार आहे. येत्या 15 दिवसात जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीने ही यादी उपलब्ध झाल्यानंतर नियुक्त्या जाहीर केल्या जाणार असल्याचे ना. मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.