मुंबई – पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावल्यानंतर भारतीय टीम आता दुसऱ्या मॅचसाठी तयार झाली आहे. टीम इंडियाला आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध पुढचा सामना खेळायचा आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. नेदरलँडविरुद्ध देखील टीम इंडियाला पुन्हा एकदा दर्जेदार क्रिकेट खेळावे लागणार आहे कारण एक चूक खूप महागात पडू शकते.
सोपा वाटत असला तरी भारतासाठी नेदरलँड विरुद्धचा हा सामना फार महत्वाचा आहे.म्हणूनच नेदरलँडला हल्क्यात घेणं भारताला परवडणार नाही. संपूर्ण ताकदीनिशी भारत हा सामना खेळेल अशी सर्वांना आशा आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळाला असला तरी तो शेवटच्या चेंडूवर मिळवला गेला. अशा स्थितीत एकतर्फी विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे.त्यामुळे आजचा सामना फार उपयोगी ठरणार आहे.
टीम इंडियाला लक्षात ठेवावे लागेल की प्रत्येक सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. T20 विश्वचषक 2022 स्पर्धेवर हवामानाचा परिणाम दिसून येत आहे. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला पॉइंट शेअर करावे लागले आणि इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले. कधीकधी अशी परिस्थिती भारतीय संघाच्या सामन्यांमध्ये येऊ शकते, अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी प्रत्येक सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे.
भारतीय फलंदाजी संघ खूपच तंदुरुस्त आहे पण चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्माचा फॉर्म.अशा स्थितीत नेदरलँडविरुद्ध रोहितला लयीत उतरावे लागेल. गेल्या 10 सामन्यांमध्ये रोहित शर्माने एकही टी-20 अर्धशतक झळकावलेले नाही. येत्या मोठ्या सामन्यांपूर्वी त्याला धावा कराव्या लागणार हे स्पष्ट आहे.पाकिस्तानच्या पहिल्या 10 षटकात फक्त 60 धावा होत्या, पण तरीही या संघाने 159 धावांपर्यंत मजल मारली. डेथ ओव्हर्समध्ये सुधारणा करण्याची गरज भारताला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या सर्व कारणांमुळे टीम इंडियासाठी हा विजय महत्वाचा ठरणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता सुरू झाला होता, परंतु नेदरलँड विरुद्ध खेळला जाणारा सामना 12.30 वाजता सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर नाणेफेक 12 वाजता होऊ शकते. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. हॉटस्टारवर तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता.