…म्हणून मुंगुस बॅटचा वापर थांबवला – मॅथ्यु हेडन

मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा कसोटीपटू फलंदाज व सलामीवीर मॅथ्यु हेडन याने आयपीएल स्पर्धेतील एका मोसमात अनोख्या मुंगुस बॅटने खेळ केला होता. त्यानंतर ही विचित्र रचनेची बॅट क्रिकेटविश्वात प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र, त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीने सल्ला दिल्याने मी पुन्हा अशी बॅट कधीही वापरली नाही, असे स्पष्टीकरण हेडनने दिले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना 2010 साली झालेल्या स्पर्धेत हेडनने वापरलेली ही बॅट चर्चेचा विषय ठरली होती. तसेच त्याचेच अनुकरण करत अनेकांनी क्रीडा साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये अशा बॅट खरेदी करण्यासाठी चक्क रांगा लावल्या होत्या. या बॅटचा आकार खूपच वेगळा होता. दांडा नेहमीपेक्षा जास्त लांब व ब्लेड लहान अशी रचना असलेली ही बॅट हेडनने लोकप्रिय केली. या बॅटने मारलेला शॉट नेहमीच्या बॅटपेक्षाही 20 ते 25 मीटर जास्त लांब जात होता.

अर्थात या बॅटच्या वापराने हेडनच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीवर परिणाम होईल हे धोनीने निदर्शनास आणून दिले. तसेच हेडनच्याच पावलावर पाऊल ठेवत नवोदित खेळाडू अशा बॅटचा सातत्याने वापर करतील व त्यांच्याही खेळात त्रुटी निर्माण होतील त्यामुळे ही बॅट वापरु नकोस असा सल्ला धोनीने दिला होता. तो मान्य करत या मोसमानंतर हेडनने ही बॅट कधीही वापरली नाही. या स्पर्धेत त्या मोसमात हेडनने या बॅटने फलंदाजी करताना जवळपास 22 च्या सरासरीने 346 धावा केल्या होत्या. तसेच या मोसमाचे विजेतेपदही चेन्नई संघानेच मिळवले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.