मनोहर जोशी यांचे ‘ते’ विधान वैयक्तिक – नीलम गोऱ्हे

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मंगळवारी मांडलेल्या भूमिकेमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पुन्हा कधीच भाजपबरोबर जाणार नाही असे म्हणता येऊ शकणार नाही. भविष्यात ते एकत्र येऊ शकतील. योग्यवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे जोशी यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र शिवसेनाच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मनोहर जोशींच्या या वक्यव्याचं खंडन केले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले कि, हे मनोहर जोशी यांचं वैयक्तिक मत आहे. या जेष्ठ पिढीच्या अशा भावना स्वाभाविक असल्या तरीही अशी शिवसेनेची कोणतीच भूमिका नाही. तसेच सध्याचे भाजपचा मार्ग व व्यवहार सहकारी मित्र पक्षांना संपवण्यासाठी असल्याने त्या मार्गाला स्विकारणे शिवसेनेला शक्य नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची लोकशाही विकास आघाडी मजबुत असून ते जनतेशी प्रामाणिकपणे बांधीलकी ठेऊन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्याने शिवसेना आणि भाजप या जुन्या मित्रपक्षांमध्ये फाटाफूट झाली. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रिपदाची सुत्रे उद्धव यांनी स्वीकारली. मात्र, मंत्र्यांचे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार या प्रक्रिया अजूनही रखडल्या आहेत. त्या पक्षांची विचारसरणी भिन्न असल्याने त्यांचे सरकार किती काळ टिकणार, असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.