आडमुठे धोरण; “आरटीई’चे अनुदान रखडले

येरवडा, विश्रांतवाडी परिसरातील शिक्षण संस्थांचे निवेदन

पुणे / विश्रांतवाडी – शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी “आरटीई’ अर्थात शिक्षण हक्‍क कायदा अंमलात आला आहे. याचे काटेकोर पालन करत अनेक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. मात्र अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शासकीय अनुदान अनेक वर्षांपासून रखडल्याची तक्रार येरवडा, विश्रांतवाडी परिसरातील शैक्षणिक संस्थाचालकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन इंडिपेन्डन्ट्‌स इंग्लिश स्कुल असोसिएशनने पुणे मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांना दिले आहे.

याबाबत असोसिएशनच्या अध्यक्ष जागृती धर्माधिकारी म्हणाल्या, “येरवडा, विश्रांतवाडी आणि धानोरी परिसरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा आहेत. या प्रत्येक शाळांमध्ये ‘आरटीइ’अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यानंतर शिक्षण विभाग शाळांची तपासणी करतो, हे अधिकारी विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतर कागदपत्रांची पाहणी करुन आरटीई प्रक्रिया शाळेने पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र मनपा शिक्षण विभाग आणि नंतर राज्य शासनाकडे जाते आणि शाळांना अनुदान मिळते. परंतु येरवडा, विश्रांतवाडी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनुदान रखडले आहे.

हे अधिकारी संस्थाचालकांना मानसिक त्रास देत आहेत. तसेच शाळा तपासणीचे काम पूर्ण न केल्यामुळे आरटीई पूर्ततेचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अनेक शाळांचे लाखो रुपये अनुदान रखडले आहे. या शाळा राज्य शासनाच्या नियमानुसार आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देत आहेत. पण, त्यांचे अनुदान आडमुठ्या धोरणामुळे रखडले आहे, असा आरोप धर्माधिकारी यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात मीनाक्षी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.