नगर । ‘त्या’ अपहृत व्यापार्‍याची अखेर हत्या

श्रीरामपूर शहरासह बेलापुरात बंद; पोलीस अधीक्षक श्रीरामपुरात तळ ठोकून

नगर (प्रतिनिधी) – बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील अपहरण झालेले व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा रविवारी वाकडी शिवारात रेल्वे रूळाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. कपडे व खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. हिरण यांचा खून करून मृतदेह रेल्वे रुळाजवळ आणून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, श्रीरामपूर, बेलापूर येथे व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला. बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता बाजार समितीच्या आवारातील गोदाम बंद करून बेलापूर बाह्यवळण रस्त्याने श्रीरामपूरला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्याजवळील पैशाच्या बॅगसह त्यांचे अपहरण झाले.

याबाबत पंकज हिरण यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला होता. त्यांच्या दुकानातील काही कामगारांचीही चौकशी केली होती. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान, व्यापारी अपहरणाच्या निषेधार्थ शनिवारी बेलापूर बुद्रुक व बेलापूर खुर्दमध्ये व्यापार्‍यांनी कडकडीत बंद ठेवला होता. हिरण यांच्याबाबत माहिती देणार्‍यास पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. 

विधानसभेच्या अधिवेशातही विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार लहू कानडे यांनी हिरण यांच्या अपहरणाचा प्रश्‍न उपस्थित केला होता. पोलिसांनी हिरणच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली होती. आज रविवारी सकाळी सातव्या दिवशी श्रीरामपूर-वाकडी शिवारात रेल्वे रूळाजवळ यशवंतबाबा चौकी परिसरात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. 

प्रवाशांनी ही माहिती पोलिसांना दिली. सुरवातीला मृतदेहाची ओळख पटत नव्हती. हिरण कुटुंबीय घटनास्थळी गेल्यानंतर गेल्यानंतर कपडे व खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. मारेकर्‍याच्या शोधण्यासाठी पथके रवाना केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज बेलापूर व श्रीरामपूर येथे व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळून मारेकर्‍यांच्या अटकेची मागणी केली.

व्यावसायिक स्पर्धेतूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्या प्रकरणात दोघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तपास योग्य दिशेने सुरु असून, आरोपी लवकरच गजाआड होतील.
मनोज पाटील, पोलीस अधीक्षक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.