मंचर शनिवारपासून लॉकडाऊन : करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी घेतला निर्णय
मंचर (पुणे)- मंचर (ता. आंबेगाव) येथे करोनाबाधितांचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी मंचर शहर शनिवार (दि. 5) ते शुक्रवार (दि. 11) या कालावधीत “टाळेबंद’ ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत नसुन दररोज 20 ते 30 रुग्ण मंचर शहरात आढळून येत आहेत. शहरात रुग्णांची संख्या 431 झाली आहे. मंचर हे तालुक्यातील व्यापाराचे केंद्र असल्याने 103 गावांचा दैनंदिन संपर्क येत असल्याने करोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. मंचर शहरातील नागरिक आणि बाहेरुन येणारे नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक झाली, त्यात सात दिवस मंचर पूर्णपणे बंद राहणार आहे.
नागरिकांनी आठवडाभराच्या जिनसा, किराणा, भाजीपाला घेवून ठेवावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
बैठकीला शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपचे पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजु इनामदार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंत बाणखेले, साईनाथ पतसंस्थेचे संचालक युवराज बाणखेले, धनेश मोरडे, संदीप बाणखेले, अरूण लोंढे, पंडित माशेरे, व्यापारी महासंघाचे सोमनाथ खुडे, दिलीप महाजन, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात, आशिष पुंगलिया, गणपत कोकणे, डॉ. सुनील खिंवसरा, डॉ. सचिन गाडे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. ओंकार काजळे यांच्यासह ग्रामस्थ आणि व्यापारी उपस्थित होते.
- धारावी पॅटर्न राबवणार
धारावी पॅटर्नप्रमाणे मंचर शहरात प्रभागानुसार स्वयंसेवक नेमून प्रत्येक घरातील नागरिकांची माहिती गोळा करुन त्याप्रमाणे उपाययोजना करण्याचे ठरले आहे, अशी माहिती संजय थोरात यांनी दिली.