पुणे – शाळेच्या आवारात असलेल्या विश्राम कक्षात शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर भागातील एका शाळेत ही घटना घडली.
शिवलिंग ऊर्फ सागर कोरे (45, रा. महादेवनगर, मांजरी) असे आत्महत्या केलेल्या शिपायाचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. कोरे महादेवनगर भागातील एस. एम. जोशी विद्यालयात शिपाई होते. शाळेतील वर्ग खोल्या तसेच प्रवेशद्वाराची चावी कोरे यांच्याकडे असायची. कोरे यांना गिर्यारोहणाची आवड होती. दोन दिवसांपूर्वी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाही.
दरम्यान, बुधवारी (1 सप्टेंबर) कोरे यांनी शाळेच्या आवारात असलेल्या शिक्षकांच्या आराम खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
कोरे यांनी आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यामागे दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे.