अकोले – पंचायत समितीचे सर्व 12 पैकी 11 सदस्य आमदार वैभव पिचड यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असूूून ठाकर समाजही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज येथील आ.वैभव पिचड यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा सभापती व शिवसेना नेत्या मेंगाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांच्या समवेत पं स सदस्य नामदेव आंबरे, दत्ता देशमुख, गोरख पथवे, देवराम सामेरे, दत्तात्रय बोऱ्हाडे, सीताबाई गोंदके, ऊर्मिला राऊत, अलका अवसरकर, माधवी जगधने, सारिका कडाळे 10 सदस्य उपस्थित होते. पर्यायाने उपसभापती व बंडखोर शिवसेना नेते मारुती मेंगाळ यांचे आसन डळमळीत झाले आहे.
मेंगाळ म्हणाल्या, पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडी प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा दिला होता. त्यांच्या पाठींब्यावर मी सभापती झाले. पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात युती झाली. त्यामुळे मी पक्षाच्या भूमिकेबरोबर असल्याचे सांगितले. आम्ही 11 सदस्य आपापल्या गणात सर्वाधिक मताधिक्य आमदार वैभव पिचड यांना मिळवून देऊ आणि प्रत्येक सदस्य आपापल्या गणात प्रचार सुरू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देवराम सामेरे यांनी हा निर्णय घेतांना आपल्यावर व सहकाऱ्यांवर कुठलाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले. दत्तात्रय देशमुख यांनी अकोले तालुक्याला पिचड यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. पिचड यांना अधिकाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कैलासराव वाकचौरे, मच्छिंद्र धुमाळ, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, महेश नवले, प्रभाकर फापाळे, कैलास शेळके, प्रदीप हासे, रामहरी तिकांडे, मच्छिंद्र मंडलिक, वाल्मिक नवले, प्रमोद मंडलिक, भरत मेंगाळ, गणेश कानवडे आदी यावेळी उपस्थित होते.