लंडन – इंग्लंडमध्येही करोनाचा धोका वाढत असल्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्डस मैदानाऐवजी साऊदम्पटन येथील रोस बाऊल मैदानावर होणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. हा सामना येत्या 18 ते 22 जून या कालावधीत होत आहे.
भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा पराभव करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. न्यूझीलंडने यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जात असलेल्या लॉर्डस मैदानावर होणार असे सांगितले गेले होते मात्र, आता करोनाचा धोका लंडन शहराच्या वेशीवर आलेला असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच हा सामना आता साऊदम्पटनला खेळवला जाणार आहे.
18 ते 22 जून या कालाधीत होणाऱ्या या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार की नाही याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, विशेष निमंत्रितांना सामना पाहण्यासाठी आमंत्रण दिले जाणार असल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. हा सामना जिंकणारा संघ पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा
विजेता ठरेल.