पुणे – पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची तब्बल 4 हजार 53 प्रकरणे वर्षभरात निकाली काढली. करोना कालावधीत सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन नियमात बसणारी प्रकरणे मार्गी लावून उत्तम कामगिरी केली.
पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांचे कामकाज चालते. या कार्यालयात नेहमीच कामाचा व्याप असतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतानाही उपलब्ध मनुष्यबळावर कामकाज पूर्ण करण्यातचा प्रयत्न असतो.
वर्षभरापूर्वी या कार्यालयाच्या सहसंचालक पदी डॉ. मोहन खताळ यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेत कामे पूर्ण करण्याबाबत आणि पारदर्शी कारभारांच्या अनुषंगाने शिस्त लावली. कार्यालयात गर्दीच होऊ नये व कोणी भेटायला येण्याची आवश्यकता नाही, यादृष्टीने डॉ. खताळ यांनी कामकाजात बदल केले. अनागोंदी कारभारालाही लगाम घातला.
गेल्या वर्षभरात या कार्यालयाकडे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची विविध स्वरुपाची 4 हजार 411 प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील 86.78 टक्के निकाली काढली. महाविद्यालयीन कार्यालयस्तरावर एकूण 178 प्रकरणे प्रलंबित आहेत. महाविद्यालय व विद्यापीठस्तरावर त्रूटींमुळे 172 प्रकरणे प्रलंबित आहेत. संचालनालय स्तरावर केवळ 8 प्रकरणे प्रलंबित आहेत. राज्यातील इतर विभागीय कार्यालयांच्या तुलनेत पुणे कार्यालयाने करोनाच्या संकटाचा सामना करत कामात बाजी मारली आहे.
विविध प्रकरणांची स्थिती
तपशील – दाखल प्रकरणे – निकाली प्रकरणे – प्रलंबित प्रकरणे
भविष्य निर्वाह निधी परतावा – 2 – 2 – 0
शिक्षकांची वेतननिश्चिती – 611 – 596 – 15
सेवानिवृत्ती सुधारित – 201 – 194- 7
सेवानिवृत्ती नियमित – 648 – 619 – 29
शिक्षकेत्तर कर्मचारी वेतननिश्चिती – 275 – 261-14
डी.सी.आर.जी.- 708 – 671 – 37
वैद्यकीय – 1181 – 1074 – 107
सेवानिवृत्ती तात्पुरती – 87 – 79-8
भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान – 371 – 320 -51
भविष्य निर्वाह निधी नापरताना -291-228-63
अनुकंपा – 38-11-27
एकूण – 4411-4053 – 358