अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या विस्तारीत क्षेत्रात असणाऱ्या तेलाच्या तीन टॅंकरवर बहुदा ड्रोनने हल्ला करण्यात आला. त्याची आग भडकली असून त्यात तीन जण मरण पावले तर सहा जण जखमी झाले.
जखमींपैकी काहीची प्रकृती चिंताजनक असून मृतांची ओळख पटली आहे. त्यात दोन भारतीय तर एका पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. मात्र संध्याकाळपर्यंत जखमींची ओळख पटू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे सांगत या संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तातडीने कोणालाही जबाबदार धरले नाही. संयुक्त अरब अमिरातला लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला घडवल्याचा दावा येमेनमधील हौथी बंडखोर गटाने केला आहे. इराणचा पाठिंबा असणाऱ्या हौथी गटाने अमिरातीवर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत.
अबुधाबी पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात दोन लहान वस्तू उडताना दिसत आहेत. त्या ड्रोन असण्याची शक्यता आहे. ते दोन ठिकाणी पडले. त्यानंतर स्फोट होऊन आग लागली. यात फार हानी झाली नसल्याचे सांगत नुकसानीचा तपशील नंतर जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
अमिरातीचे एक जहाज हौथीने वर्षभरापुर्वी ताब्यात घेतले होते. त्यानंतर अमिराती लष्कराने अरब राष्ट्रातील सर्वात गरीब असणाऱ्या येमेनमध्ये फौजा घुसवल्या होत्या, अलीकडे त्या बऱ्याच प्रमाणात मागे घेतल्या असल्या तरी अमिराती बंडखोरांना रसद पुवल्याचा अरोप होत असतो.