terrorist attack –काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. अमृतसर, पंजाब येथून श्रीनगरमध्ये आलेल्या दोन युवकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून मारल्याने राज्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अमृतपाल सिंग (३१, रा. अमृतसर) आणि रोहित (२७) अशी दोघांची नावे आहेत.
बुधवारी संध्याकाळी श्रीनगर शहरातील शहीद गंज भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि गोळ्या झाडून दोन गैर-स्थानिक तरुणांना जखमी केले. यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी आणखी त्या तरुणाचाही मृत्यू झाला.
दोन्ही तरुण पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी होते. टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी श्रीनगरमध्ये अतिरिक्त चौक्या उभारून तपास करण्यात आला. यापूर्वी २०२१ मध्ये दहशतवाद्यांनी शाळेत घुसून शीख महिला प्राचार्याची हत्या केली होती.
ताज्या घटनेनंतर दहशतवाद्यांचा सुगावा शोधण्यासाठी जवळपासच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. यासोबतच श्रीनगरला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्येही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. शब-ए-मेहराजच्या पवित्र मुहूर्तावर दहशतवाद्यांनी घृणास्पद कृत्य केले आहे. याचा सर्व प्रमुख पक्षांनी निषेध केला आहे.