अहमदाबाद – गुजरातमधील एका मच्छीमाराचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण उघड होऊ शकले नाही. जयंती सोलंकी (वय 50) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.
पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणेने आपल्या सागरी हद्दीत शिरकाव केल्याचा कांगावा करत मागील वर्षी सोलंकीला पकडले. त्यानंतर वर्षभरापासून तो पाकिस्तानी कैदेत होता. काही आठवड्यांपूर्वी त्याचे निधन झाले. मात्र, त्याविषयीची माहिती गुजरात प्रशासनाला रविवारी समजली. त्यानंतर सोलंकीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने एक पथक अट्टारी-वाघा सीमेवर पाठवले.
ते पथक सोलकींचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवेल. पाकिस्तानी सागरी यंत्रणा सातत्याने कुरापती करून भारतीय मच्छीमारांना भर समुद्रात ताब्यात घेते. त्या देशाच्या कैदेत अद्यापही अनेक भारतीय मच्छीमार आहेत.