हैदराबाद – तेलंगणातील निजामाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्यावरून झालेल्या संघर्षानंतर परिस्थिती शांत आहे, असे पोलिसांनी सांगितले. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये जोरदार निदर्शने आणि दगडफेकीचा प्रकार घडला होता.
या संदर्भात पोलिसांकडे चार वेगवेगळी प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत आणि दगडफेकीमध्ये सहभागी असलेल्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोधन शहरातील एका चौकामध्ये एका गटाने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून ठेवलेला होता. त्याला या भागातील दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली. या तणावाचे पर्यावसन दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेकीमध्ये झाले.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. काल घडलेल्या या प्रकारानंतर आता बोधन येथील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू असून परिस्थितीनुसार हे आदेश उठवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ काही हिंदू संघटनांनी बोधन येथे बंदचे आवाहन केले आहे. संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसांनी 213 जणांना ताब्यात घेतले आहे. काही भागातील दुकाने स्वेच्छेने बंद ठेवण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. बोधन महापालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबतचा ठराव केला होता, असे एका राजकीय पक्षाशी संबंधित एका गटाने म्हटले आहे. तर पुतळ्यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेलेली नव्हती, असे दुसरया गटाशी संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले.