उदयनराजे त्याठिकाणी येतील, या शक्यतेवर शंभूराज देसाई यांच्या घराजवळ
सातारा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाजवळील इमारतीच्या भिंतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र काढण्याच्या कारणावरुन गेल्या चार दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा हे चित्र काढण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हे काम थांबवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा येथील समर्थक राहुल पाटोळे यांनी उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त तालीम संघाजवळील एका इमारतीच्या भिंतीवर त्यांचे मोठे छायाचित्र रेखाटले आहे. त्याच धर्तीवर त्यांनी पोवई नाका येथे उदयनराजे यांच्या मालकीच्या इमारतीच्या भिंतीवर चित्र रेखाटण्यासाठी तयारी सुरु केली होती. क्रेनच्या माध्यमातून भिंत रंगविल्यानंतर शनिवारी त्याठिकाणी चित्र काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. यासाठी आणलेली क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यात येत होती. यास पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेत मंत्री देसाई आल्यानंतर चर्चा करुन पुढील कारवाई करा, असे संबंधितांना सांगितले होते.
त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याठिकाणी आलेल्यांना हटकले. याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री त्याठिकाणी सातारा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर, शाहूपुरीचे संजय पतंगे मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. या प्रकाराची माहिती काही जणांनी उदयनराजे भोसले यांना दिल्याची चर्चा सुरु झाल्याने पोलिस दल ऍक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जलमंदिरातील हालचालींवर जास्तीचे लक्ष केंद्रित केले.
मोठा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. यानंतर पडद्याआड काही घडामोडी घडल्या आणि चित्र रेखाटण्याचे काम थंडावले. हे काम थंडावले असले तरी त्याठिकाणचा पोलिस बंदोबस्त कायम होता. मंगळवारी सकाळी ते काम पुन्हा सुरु झाले. चित्राच्या मार्किंगचे थोडे काम झाल्यानंतर हे काम पुन्हा बंद करण्यात आले. यानंतर तणाव निर्माण झाला व पोलिसांची तारांबळ उडाली. सकाळी पुन्हा एकदा हे चित्र रेखाटण्याचे काम सुरू झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांसह पेंटरला ताब्यात घेत सातारा शहर पोलिस ठाण्यात घेऊन गेले.