लोणावळ्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांचे नागरिकांना आवाहन
नगरपरिषदेच्या कामासाठी ई-मेलवर किंवा फोन क्रमांकावर संपर्क साधावा
लोणावळा – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी अतिमहत्वाच्या व तातडीच्या कामाशिवाय नगरपरिषदेसह अन्य कुठल्याही शासकीय कार्यालयांना भेट देऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी लोणावळेकरांना केले आहे. याशिवाय नगरपरिषदेमध्ये काही चौकशी करायची असल्यास पालिकेच्या ई-मेल आयडीवर मेल करावा किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी गरजेशिवाय सार्वजनिक ठिकाणी, बाजार पेठेत, उद्याने, पर्यटनस्थळे, धार्मिकस्थळे व अन्यत्र वावर किमान येत्या 31 मार्चपर्यंत टाळावा. सोबतच करोना विषाणूच्या बाबत सोशल मीडियावर अफवा पसरत असून, त्यावर विश्वास ठेवू नयेत, असेही आवाहन नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांसाठी करण्यात येत आहे.
एकीकडे करोनाला प्रतिबंध घालण्याबाबत नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नागरिकांनी देखील आता कामाशिवाय घराबाहेर पडणं बंद केले आहे. त्यामुळे लोणावळा नेहमी गजबजलेल्या लोणावळा बाजारपेठेत कमी-अधिक प्रमाणात शुकशुकाट निर्माण झाला आहे. पर्यटकांची संख्या देखील रोडावली असल्याने येथील पर्यटनस्थळ मोकळी पडली आहे.
लोणावळ्यात एकही करोना रुग्ण नाही – पवार
लोणावळा शहरात अद्यपी एकही करोनाचा रुग्ण किंवा संशयित आढळलेला नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर परदेशातून प्रवास करून आलेल्या 16 जणांना त्यांच्या राहत्या घरात क्वॉरेंटाइन करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आणि या सर्व नागरिकांना दिलेल्या सूचनांचे पालन करीत आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.