पुणे – शहरात जुलैमध्ये झालेल्या धुव्वाधार पावसाने मागील दहा वर्षांतील रेकॉर्ड मोडले आहे. 2014च्या जुलैमध्ये शहरात सर्वाधिक 282.4 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, यंदा तब्बल 359.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्येही पावसाचा जोर कायम असून, असाच पाऊस सुरू राहिला तर यंदा पाऊस सर्व रेकॉर्ड मोडणार असे दिसते. यंदा जून कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, दि. 12 नंतर पावसाने विश्रांती घेतली दि. 24 नंतर पुन्हा जोरदार हजेरी लावत शहरात धुव्वाधार बॅटिंग सुरू केली. अवघ्या आठ ते दहा दिवसांत पावसाने दहा वर्षांतील रेकॉर्ड मोडत 359.2 मिमी पर्यंत मजल मारली. दरम्यान, 1 जून ते 4 ऑगस्टपर्यंत शहरात तब्बल 666.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत शहरात 46 मिमी पाऊस झाला आहे.