पुणे -“झेड ब्रीज’वर पार्क केल्या जाणाऱ्या अनधिकृत वाहनांना आता 1 हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. काकासाहेब गाडगीळ पूल अर्थात झेड ब्रीज तरुणाईसाठी विशेषत: प्रेमी जोडप्यांसाठी विशेष लोकप्रिय आहे. अनेक प्रेमी जोडप्यांची या पुलावर विशेष गर्दी असते. त्यांच्यामुळे पुलाहून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
कोणत्याही पुलावर वाहने उभी करू नयेत, हा नियम नागरिकांकडून विशेषत: तरुणाईकडून धाब्यावर बसविला जात आहे. वारंवार समज देऊन, बोर्ड लावून देखील वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करतात. वाहनचालकांनी केलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे .वाहतूक कोंडी होते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी “बेशिस्त’ वाहनचालकांना थेट
1 हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
तरुणाईच्या सर्रास उभे राहण्यासह त्यांनी पार्क केलेल्या दुचाकींमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. अनेकदा याबाबत वाहतूक पोलिसांकडून तरुणाईला विशेष समज देण्यात येते. मात्र पोलिसांच्या या समज देण्याला तरुणाई दाद देत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांबरोबर अनेकदा वादाचे प्रसंग देखील घडतात.
पुलांवर वाहने उभी करु नयेत असा नियम आहे. मात्र नागरिक समंजसपणे या नियमाचे पालन करत नाहीत. वाहतूक पोलिसांनी वारंवार सांगून देखील नागरिक, विशेषत: तरुणाई या गोष्टी मनावर घेत नाहीत. वाहतूक कोंडी होण्यासह पादचाऱ्यांना या “बेशिस्त’ पार्किंगचा त्रास होतो. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
– किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक, डेक्कन वाहतूक विभाग