हैदराबाद – करोनाच्या धास्तीने नक्षलवादी दाम्पत्याने पोलिसांपुढे शरणागती पत्करल्याची घटना शनिवारी तेलंगणात घडली. नक्षलवादी म्होरक्यांकडून होणारी छळवणूकही त्या घडामोडीला कारणीभूत आहे. अलिकडच्या काळात करोना संसर्गाने काही नक्षलवाद्यांचा बळी घेतला.
त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्याशिवाय, म्होरक्यांकडून आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नक्षलवाद्यांमध्ये जोर धरू लागली आहे. नक्षलवादी दाम्पत्याच्या शरणागतीकडे त्या अनुषंगाने पाहिले जात आहे.
करोना संकट विचारात घेऊन तेलंगण पोलिसांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे. नक्षलवाद्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच, सरकारी धोरणानुसार त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पोलिसांकडून देण्यात आली आहे.