बर्लिन – माली देशात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा पथकावर तेथील गनिमांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. यात एकूण तेरा जवान जखमी झाले असून त्यातील बारा जण जर्मनीचे आहेत. तर आणखी एक जण दुसऱ्या देशाचा आहे. या आधी संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या सूत्रांनी या हल्ल्यात पंधरा जण जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
याबाबत माहिती देताना जर्मनीचे संरक्षण मंत्री अन्नेग्रेत क्रॅम्प-कर्रेनबऊर यांनी सांगितले की या हल्ल्यात आमचे जे बारा जवान जखमी झाले आहेत. त्यातील तीन जण गंभीर जखमी आहेत. या सर्व जखमी जवानांना गाओ येथील वैद्यकीय सुविधा केंद्रात हेलिकॉप्टरने नेण्यात आले आहे. या जखमी जवानांना तातडीने जर्मनीत विमानाने परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
जर्मनीचे असंख्य सैनिक आज मालीतील शांती सेनेत कार्यरत आहेत. मालीमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांनी मोठाच उच्छाद मांडला असून त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी तिकडे संयुक्त राष्ट्रांतर्फे सन 2012 पासून शांती सेना पाठवण्यात आली आहे. या शांती सेनेवर तेथील इस्लामिक गनिमांकडून सतत हल्ले केले जात आहेत. मध्य मालीपर्यंत या गनिमांचा वावर सुरू झाल्याने तेथील तणावात मोठीच भर पडली आहे.