पर्थ, (ऑस्ट्रेलिया) – डॉल्फिनबरोबर पोहण्यासाठी नदीमध्ये उडी मारलेल्या एका किशोरवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. या मुलीवर शार्क माशांनी हल्ला केला. त्यात या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील नॉर्थ फरमॅन्टी प्रांतातील स्वान नदीमध्ये पडलेल्या एका मुलीला शार्क माशांनी चावा घेतल्याचे आढळून आल्यावर बचाव पथकाने या मुलीला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे आढळून आले, असे प्रभारी निरीक्षकांनी सांगितले.
ही मुलगी आपल्या मित्रांसमवेत या नदीमध्ये जेट स्कीचा आनंद घेत होती. या नदीमध्ये डॉल्फिन असल्यामुळे या मुलीने डॉल्फिन माशांबरोबर पोहण्यासाठी थेट नदीमध्ये उडी मारली. मात्र या नदीमध्ये असलेल्या शार्क माशांनी तिच्यावर हल्ला केला. ही अत्यंत हृदयद्राकवक घटना असल्याचे या भागातील मच्छिमारांनी सांगितले. या नदीमध्ये शार्क असण्याची शक्यता नव्हती. मात्र काही शार्क असल्यामुळे ही मुलगी थोड्याच वेळात संकटात सापडली, असे मच्छिमारांनी सांगितले.
स्वान नदीमध्ये जलविहार करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ब्रिटीश डायव्हिंग एकस्पर्टचाही या नदीमध्ये शार्क माशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.