मुंबई – राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राची “मन की बात’ आहे. पदवीधर-शिक्षक म्हणजे संपूर्ण सुशिक्षित मतदार अशा निवडणुकीतून आपले प्रतिनिधी विधिमंडळात निवडून पाठवतो. या पाचपैकी फक्त एक जागा भाजपला मिळाली. फडणवीस-मिंधे सरकारच्या खोटारडेपणास ब्रेक लागणारे हे निकाल आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.
राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मविआ सरकारने भाजपला मोठा धक्का दिला. या निवडणुकांमध्ये भाजपला केवळ एक जागा जिंकता आली. पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. आणखी बरेच धक्के भाजप व मिंधे गटास पचवायचे आहेत. ही तर सुरुवात असल्याचा टोलाही लगाविण्यात आला.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ म्हणजे भाजपची मक्तेदारी राहिलेली नाही व विधान परिषद निवडणुकीचे ताजे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक आहे. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला. पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राजकीय वर्चस्व. तरीही भाजप पराभूत होतो, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
कोकण मतदारसंघात (शिक्षक) भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करून निवडून आले. बाळाराम पाटील हे शे. का. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीत उभे होते. पण महाराष्ट्र विकास आघाडीने त्यांना पाठबळ दिले. तरीही कोकणातील शिक्षक मतदारांनी यावेळी वेगळा निकाल दिला.
संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-मिंधे गटाची पिछेहाट होत असताना कोकणात हा एकमेव विजय त्यांना मिळाला. यात भाजपपेक्षा शिक्षक उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कर्तृत्व जास्त. म्हात्रे हे काही मूळचे भाजपचे नाहीत. भाजपला रेडीमेड उमेदवार हाती लागले. योगायोगाने ते जिंकले इतकेच, असा टोलाही शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.