पुणे – राज्यातील शिक्षकांची विविध प्रकरणे प्रलंबित पडली आहेत. ही प्रलंबित प्रकरणे त्वरीत मार्गी लावून शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा असा आग्रह शिक्षक क्रांती संघटनेने शिक्षण आयुक्तांकडे धरला आहे. त्यावर शिक्षण आयुक्तांनी तात्काळ पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांना शिक्षकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाही करून मार्गी लावावेत असे निर्देश दिले तसेच शासनस्तरावरील प्रश्न सोडविणेकामी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची भेट घेऊन सविस्तरपणे अनेक प्रश्न मांडले. यावेळी अर्जुन बारगजे, राजर्षी डोईफोडे, रेखा भांगे, शाम धुमाळ, पोपट वणवे, अविनाश कांबळे, आशिष गौड, सहदेव म्हस्के, जयेश मोरे, सागर फलके, संजय गावडे, सचिन बिब्बे, महावीर काळे, मीनाक्षी समगीर, पांडुरंग बडे, पुजा गायकवाड, सविता कडलक, स्वाती चौडकर, शितल शिंदे, किरण शिंदे आदी पदाधिकारीही उपसथित होते.
विनाअनुदानित शाळा मुल्यांकम प्रस्ताव तात्काळ शिफारशीसहीत शासनाकडे अनुदान पात्र होण्यासाठी पाठवावेत, शिक्षणसंचालक व वेतन पथक या कार्यालयात प्रलंबित असलेले वैद्यकीय बील व इतर पुरवणी बील तात्काळ मंजुर करावेत, वेतन पथक कार्यालयातील मनमानी तथा भ्रष्टाचारी कारभारास आळा घालुन शिक्षकांना दर महिन्याच्या 1 तारखेला वेतन व्हावे यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, शिक्षकांना दिवाळीला सानुग्रह अनुदान तसेच बोनस देणेत यावा, अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, विनाअनुदानित शिक्षकांना 100 अनुदान देण्यात यावे, करोनाच्या प्रादुर्भावात घाईघाईने शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात घालु नये. करोनावर लस आल्यावरच प्रत्यक्ष शाळा सुरू कराव्यात, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रखडेलेल्या भरतीचा तिढा सोडवावा आदी विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत.
शिक्षक मान्यता, वेतन, सेवाज्येष्ठता व इतर तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणावर विभागाच्या शिक्षण उपसंचालक यांनी सुनावणी घेऊन तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शासन निकष डावलून अनेक शिक्षणाधिकारी, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधिक्षक मनमानी व चूकीच्या पद्धतीने शिक्षकाचे वेतन थाबवितात. याबाबत सबंधित अधिकाऱ्यांवर शिक्षकांना वेतनापासुन वंचित ठेवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, असा आग्रहही संघटनेने धरला आहे.