डॉ. राजेश बनकर ः चाकण येथे शिक्षकांसाठी पाच दिवसीय निष्ठा प्रशिक्षण सुरू
चिंबळी – सर्व विद्यार्थ्यांचे शिकणे गतीने होण्यासाठी शिक्षकांनी बदलत्या नवीन शैक्षणिक संकल्पनांचा, माहिती-तंत्रज्ञानांचा अवलंब अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, पुणे येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा खेड तालुक्याचे संपर्क अधिकारी डॉ. राजेश बनकर यांनी निष्ठा प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांच्या समग्र व्यावसायिक विकासासाठी विकसित केलेल्या निष्ठा कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी चाकण (ता. खेड) येथील नवसह्याद्री अध्यापक विद्यालयात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून, पाच दिवसांच्या दहा टप्प्यांमध्ये तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एन. डी. पिंगळे, गटसाधन केंद्रातील साधनव्यक्ती संदीप दोडके, संतोष शिंदे, प्रतिभा भांगे,विशेष शिक्षक पुरुषोत्तम झाडे आणि सर्व तजज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय दहिफळे यांनी केले, तर सर्व उपस्थित शिक्षकांचे स्वागत आणि आभार मरकळ शाळेचे शिक्षक विनोद चव्हाण यांनी मानले.
जिल्ह्यातील 13 हजार शिक्षकांना प्रशिक्षण
निष्ठा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील 13 हजार शिक्षकांसाठी तालुकास्तरावर 19 ठिकाणी सर्व शिक्षकांसाठी पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. शाळा बंद न ठेवता प्रशिक्षणाला प्रत्येक टप्पानिहाय 150 शिक्षकांना पाठवण्याचे नियोजन पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. यावेळी राज्यस्तरावर प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ विजय दहिफळे, विलास जाधव, दयानंद शिंदे, जितेंद्र डेरे, नयना अहिरे तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणांतर्गत विषय
राज्यस्तरावरून प्रत्येक तालुक्यातील प्रशिक्षणाचे नियंत्रणही या माध्यमातून केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निकोप शालेय वातावरण निर्मिती, शाळा आधारित मूल्यांकन, शाळेमधील घटकांचे आरोग्य आणि स्वास्थ्य तसेच भाषा, गणित, परिसर अभ्यास, विज्ञान व सामाजिक शास्त्र इत्यादी विषयांचे अध्यापन शास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांचा समावेश या प्रशिक्षणामध्ये आहे.