कराड – ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली पाहिजे. त्यांना इंग्रजी विषयाचे परिपूर्ण ज्ञान आणि इंग्रजी भाषा अवगत व्हावी, यासाठी सनबीम एज्यूकेशन ट्रस्ट व श्रीनिवास पाटील फाउंडेशन यांच्यावतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना इंग्रजी विषयाचे धडे देण्यात येत आहेत, अशी माहिती खा. श्रीनिवास पाटील यांनी दिली.
सनबीम एज्यूकेशन ट्रस्ट व श्रीनिवास पाटील फाउंडेशन यांच्यावतीने शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत मात्ग्दर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सनबीम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग पाटील, पाटण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी दिपा बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, या कार्यशाळेत पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना एमकेसीएलच्या “क्लिक इंग्लिश’ कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याचे शुल्क श्रीनिवास पाटील फाऊंडेशनच्यावतीने भरण्यात येणार आहे. कार्यशाळेतील 40 शिक्षकांच्या पहिल्या बॅचचे उद्धाटन खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते कराड येथे करण्यात आले.
खा. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, इंग्रजी विषयाची भीती बालवयातच दूर व्हावी व उत्तम इंग्लिश लिहता-वाचता यावे, यासठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रथमतः शिक्षकांनी ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. सोप्या पद्धतीने इंग्लिशचे शिक्षण घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहजरीत्या कसे इंग्लिश शिकवता येईल, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सारंग पाटील म्हणाले, जगात इंग्लिश ही जास्त बोलली जाणारी भाषा असून ही भाषा देखील अवगत होणे तितकेच महत्वाचे आहे. इंग्रजी विषयाच्या प्रशिक्षणामुळे शाळांमधील इंग्रजी विषयातील गुणवत्ता सुधारण्यास निश्चितच मदत होणार आहे. हे प्रशिक्षण सातत्याने घेण्यात येणार आहे. विद्यार्थी इंग्रजी विषयामध्ये मागे राहू नयेत, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी अनिल गावंडे, प्रशांत लाड, सुनील जोशी, पराग पारवे, विक्रम जाधव, अमोल पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.