नवी दिल्ली – आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर परतावा भरण्याची अंतिम मुदत संपून आता एक आठवडा झाला आहे. मात्र काही करदाते अजुनही आपला कर परतावा भरत आहेत. यंदाच्या वर्षी टॅक्स रिटर्नचा अर्थात कर परतावा भरण्याचा नवा विक्रम स्थापित झाला आहे. तथापि, कर परतावा भरणारे बहुतांश लोक अद्यापही जुन्या पध्दतीलाच प्राधान्य देत असल्याचे आयकर विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून निदर्शनास येते आहे.
कर भरण्यासाठी कर दात्यांना दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिला पर्याय जुनी कर व्यवस्था अर्थात ओल्ड टॅक्स रेजीम आहे तर दुसरा पर्याय म्हणजे न्यू टॅक्स रेजीम आहे. त्याची सुरूवात काही वर्षापासून झाली आहे आणि ही प्रणाली आकर्षक होण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्नही केले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांनी ही प्रणाली स्विकारावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
नवी कर परतावा पध्दती आकर्षक करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात काही बदल करण्यात आले होते. जे लोक ही नवी व्यवस्था स्विकारतील त्यांना डिडक्शनमध्ये काही फायदा देण्याची घोषणा केली गेली. मात्र असे असूनही लोकांकडून जुन्याच पध्दतीला प्राधान्य दिले जाते आहे.
फिनटेक कंपनीने या संदर्भात विश्लेषण करून त्याचे आकडे सादर केले आहेत. फिनटेक कंपनी अगोदर क्लिअरटॅक्स या नावाने ओळखली जायची. कर परतावे सादर करण्याशी संबंधित अडचणींवर तोडगा सूचवण्याचे काम या कंपनीकडून केले जाते.
छोट्या-मोठ्या व्यावसिांयकांसह 50 लाख करदाते या कंपनीचे ग्राहक आहेत. त्यांच्या विश्लेषणानुसार 100 पैकी 85 ग्राहकांनी जुन्या पध्दतीलाच पसंती दर्शवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुनीच प्रणाली स्विकारली गेली असल्यामुळे लोकांचा कल तिकडेच असल्याचे स्पष्ट होते.
मात्र नवी प्रणाली स्विकारणाऱ्यांची संख्याही 15 झाली आहे याचा अर्थ ही प्रणालीही हळूहळू आपली जागा निर्माण करू लागली आहे.
दरम्यान, आयकर विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 31 जुलै 2023 च्या अंतिम मुदतीपर्यंत 6.77 कोटी जणांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा 1 कोटीने जास्त आहे. हजार रूपये दंड भरून रिटर्न भरणाऱ्यांची संख्याही वाढत असून येत्या काही दिवसात टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांची संख्या आणखी वाढलेली दिसेल.