नवी दिल्ली – मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्याचबरोबर आगाऊ कर भरण्याची रक्कम तब्बल 54 टक्क्यांनी वाढून 4.60 लाख कोटी रुपये झाली असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी आतापर्यंत फक्त 3.19 लाख कोटी रुपयांचा आगाऊ कर भरणा झाला होता. प्रत्यक्ष कर संकलन 60 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 5.88 लाख कोटी रुपयाचे प्रत्यक्ष कर संकलन झाले होते. आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलनातून जमा झालेली रक्कम तब्बल 9.45 लाख कोटी इतकी आहे.
कर संकलनाची एकूण आकडेवारी पाहता आगामी काळात कर संकलन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विवरण भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून नवे पोर्टल व्यवस्थित काम करत असल्याचे सांगण्यात आले.