मुंबई – विकसित देशात ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे जागतिक व्यापारावर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे. या भीतीमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड विक्री होऊन शेअर बाजार निर्देशांक कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,189 अंकांनी म्हणजे 2.90 टक्क्यांनी कोसळून 55,822 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 371 अंकांनी कोसळूून 16,614 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील कंपनीचा शेअर पाच टक्क्क्ायनी कोसळला. स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स, एचडीएफसी, एनटीपीसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मात्र या अवस्थेतही हिंदुस्थन युनिलिव्हर आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
शेअर बाजारातील सर्व क्षेत्राचे निर्देशांक आज घसरले. आज झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक आता चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत असे रेलिगेअर ब्रोकिंग या संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले. मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचे मिड कॅप आणि स्मॉल कॅप 3.42 टक्क्यांपर्यंत कोसळले. जागतिक शेअर बाजारातही आजा विक्रीचे वारे होते.
विक्रीचे कारण काय
विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिका व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत आहेत. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2,069 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. त्याचबरोबर विकसित देशांमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे तेथील विकास विकास दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले. त्याचा परिणाम भारतातही होऊन विक्री झाली.