मुंबई – मिठापासून सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या टाटा सन्स उद्योग समुहाच्या अध्यक्षपदी एन चंद्रशेखरन यांची पुन्हा पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीला टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला रतन टाटा यांनी या बैठकीत पूर्णपणे पाठिंबा दिला. गेल्या पाच वर्षांमध्ये चंद्रशेखरन यांनी टाटा सन्समधील कंपन्यांची जबाबदारी पूर्ण कार्यक्षमतेने सांभाळली आहे, असे रतन टाटा यांनी सांगितले आणि त्यांची अध्यक्षपदी पुन्हा पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यास संमती दिली.
या नियुक्तीबद्धल 58 वर्षीय चंद्रशेखरन यांनी समाधान व्यक्त केले. आपण गेली पाच वर्षे ज्या पद्धतीने कारभार पाहिला अशाच प्रकारे पुढील पाच वर्ष कारभार पाहू असे त्यांनी सांगितले. टाटा समूहाचे यापूर्वीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या दरम्यान प्रचंड मतभेद आणि कायदेशीर लढाई झाल्यानंतर 2017 मध्ये चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
चंद्रशेखरन टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पावर आणि टीसीएस त्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. त्यांनी या अगोदर टीसीएस कंपनीमध्ये प्रदीर्घ काळ काम केले होते. 154 वर्षाचा टाटा समूह सध्या रिटेल क्षेत्रामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्यामध्ये टाटा समूहाने एअर इंडिया ही भारत सरकारची कंपनी यशस्वीरीत्या खरेदी केली आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रशेखरन यांनी यशस्वी प्रयत्न केले. आता ही कंपनी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.