मुंबई – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजही त्यांचे सौंदर्य तरुणींना लाजवले असे आहे. आज मृणाल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते, तसेच मनोरंजन सृष्टीतील त्यांचे मित्रमंडळी त्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. तर त्यांची मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
काही वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णी चीनला फिरायला गेल्या, तेव्हा तेथे तळलेले किडे त्यांनी खाल्ले होते. त्याची चव कशी होती आणि तळलेले किडे खाण्याचा तो अनुभव कसा होता हे त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. सध्या त्यांची ही मुलखात चांगलीच चर्चेत आली आहे.
मुलाखतीत त्या म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी मी फॅमिलीसोबत चीनला फिरायला गेले होते. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती.”
दरम्यान,आपल्या अभिनयाने लोकांवर जादू करण्यात माहीर असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा जन्म 21 जून 1971 रोजी पुण्यात झाला. मृणाल यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातूनच झाले. त्याचबरोबर त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणही केले. मृणाल जेव्हा फक्त 16 वर्षांची होती तेव्हा तिने मराठी मालिकेतून स्वामी या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केले. या मालिकेत तिने पेशवे माधोराव यांच्या पत्नी रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, मृणाल या अजूनही सोनपरी या नावानेच ओळखल्या जातात.