पुणे (संजय कडू) -सायबर चोरट्यांनी समाज माध्यमांवर आपले नेटवर्क चांगलेच पसरवले आहे. त्यांनी आजवर फेसबुक, व्हॉट्सऍप या लोकप्रिय समाजमाध्यमांना “टार्गेट’ केले होते. यानंतर आलेले टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवरही त्यांनी आता आपला मोर्चा वळवला आहे. या माध्यमातून ते दरवेळी नव्या आयडिया वापरून गरजू नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून सायबर भामट्यांनी टेलिग्रामवर “वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवत फसवणुकीचा नवा फंडा पसरवला आहे. मागील पंधरा दिवसांत भामट्यांनी फसवणूक केल्याच्या दहा तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर चोरटे टेलिग्रामवर दोन पद्धतीने आर्थिक फसवणूक करत आहेत. यामध्ये वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवणे, आणि आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणे. हे सायबर भामटे प्रथम टेलिग्राम युजर्सना वर्क फ्रॉम होमचा मेसेच पाठवतात. यामध्ये कामाचा चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवले जाते. प्रथम नोंदणी करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर डेटा एंट्री, पीडीएफ फाइल्स जेपीजीमध्ये रुपांतरित करणे किंवा अनेक ऑनलाइन व्हिडिओ किंवा प्रोग्रामवरील लाइक बटणावर क्लिक करणे किंवा काही कायदेशीर कागदपत्रे लिहिणे यासारखे कोणतेही काम देण्यात येते. काम सबमिट केल्यानंतर 15 हजार ते रु. 20 हजारांपर्यंत काही पैसे मिळतात. त्यानंतर पीडित व्यक्ती जाळ्यात अडकत जातो. पुढे त्याला दिलेल्या कामात चुका काढल्या जातात. त्याचा जाब विचारुन पीडित व्यक्तीला कायदेशीर कारवाईची भीती दाखवत पैसे वसूल केले जातात.
प्रकरण क्र. 1
एका पीडित महिलेने काम केल्यानंतर तिला तीन महिन्यांच्या कामाचे 70 हजार रुपये येणे होते. मात्र, तिला कोणताही मोबदला न देता फुकट काम करुन घेण्यात आले. अखेर तिने सायबर पोलिसांत धाव घेतली आहे.
प्रकरण क्र. 2
ठराविक रक्कम गुंतवून जादा पटीत परतावा देण्याचे आमिष दाखवत एका युवकाला फसवण्यात आले आहे. यात सुरुवातीला हे भामटे काही अंशी परतावा देतात. नंतर गुंतवणूक वाढवण्यास सांगतात आणि टेलिग्राम खाते बंद केले जाते.
फसवणूक करणाऱ्यांचा माग काढण्यासाठी टेलिग्राम कंपनीला काही ई-मेलही पाठवले आहेत. मात्र, त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. फसवणूक करणाऱ्यांच्या बॅंक खात्यांच्या तपशीलांचा अभ्यास आम्ही करत आहोत. ही खाती बहुतांश गाझियाबाद, दिल्ली, नोएडा आणि देशाच्या इतर भागांत असलेल्या बॅंकांमध्ये आहेत. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे.
– मीनल पाटील, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन