पुणे -रेल्वेत नोकरीचे आमिष तसेच बनावट नियुक्तीपत्र देत दहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा भावांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.
योगेश माने आणि नीलेश माने (रा. ताडिवाला रस्ता) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अभिषेक तांबे (रा. कात्रज) विरुद्ध बंडगार्डन पोलिसांत एका व्यक्तीने फिर्याद दिली होती. आरोपी रेल्वेच्या पार्सल विभागात नुकतेच कामाला लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना पुणे रेल्वेच्या “रेल्वे मेल सर्व्हिस’ (आरएमएस) या विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून गुगल पेद्वारे 10 लाख 81 हजार रुपये घेतले. त्यानंतर भारतीय रेल्वेची मुद्रा असणारे व “आरएमएस’ विभागात नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. फिर्यादीसह अन्य व्यक्ती नियुक्तीपत्र घेऊन प्रशासनाकडे गेल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, योगेश माने व नीलेश माने हे दोन संशयित पुणे स्थानकाच्या पार्सल गेट येथे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून आठ खाकी रंगाचे लिफाफे, प्रत्येक लिफाफ्यात बनावट नियुक्तीपत्र, चार चेकबुक, पाच पासबुक, 10 सेंट्रल रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र, दोन मोबाइल, रेल्वेचे बनावट ओळखपत्र असा मुद्देमाल आढळला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, विशाल दळवी, संदीप शिर्के, रेहाना शेख आदींच्या पथकाने केली.