नगर – मंगल कार्यालयामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. जेणेकरून बाल विवाह कायद्याचे उल्लंघन होणार नाही. तसेच रहदारीस कोणताही अडथळा होऊ नये यासाठी, वाहन पार्किंगचे नियोजन करून सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. अन्यथा नियमांचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येइल, अशी तंबी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील मंगलकार्यालय चालक-मालकांना दिली.
शहरातील सुमारे 25 मंगल कार्यालय मालक व चालकांची बैठक कोतवाली पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अविनाश कोतकर, गणेश कराळे, उमेश कोतकर, अक्षय राहींज, गिरी गोसावी, सुरेश खरपुडे, विशाल पटवेकर, अवधूत फुलसौंदर, युवराज शिंदे, रघुनाथ चौरे उपस्थितीत होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास प्राधान्य देऊन, पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पो. नि. यादव यांनी केले. मंगल कार्यालयामध्ये लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम त्या ठिकाणी काही वेळा गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकार घडतात. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना केल्या.
रात्री 10 नंतर डीजे बंद
लग्न समारंभात ध्वनिक्षेपकाचा वापर हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 55 डेसिबलचे पातळीमध्येच वाजवावा. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. डीजे व डॉब्ली लावण्याची परवानगी देऊ नये, रात्री 10 नंतर कोणत्याही परिस्थितीत ध्वनिक्षेपकाचा वापर करून देऊ नये, असे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.