पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार होईल, अशी अपेक्षा जनसामान्यांची होती. मात्र, सव्वा वर्षांत ही अपेक्षा फोल ठरली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन धाडी टाकत लाचखोरांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे प्रशासकीय राजवटीपेक्षा नगरसेवकांची राजवट बरी होती, अशी म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचा 13 मार्च 2022 ला कार्यकाळ संपला. त्यानंतर महापालिकेत गेल्या सव्वा वर्षापासून आयुक्तच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहे. सुरुवातील तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी कारभार पाहिला. आयुक्त शेखर सिंह प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत.
प्रशासकीय राजवटीत महापालिकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचे वारंवार समोर आले आहे. प्रशासकीय राजवटीत 3 ऑगस्ट 2022 रोजी नगररचना विभागातील सर्व्हेअरने एकाकडे दोन लाखांपेक्षा अधिक लाच मागणी केल्याप्रकरणी अटक केली. 21 मार्च 2023 मार्च पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला एक लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आता बुधवारी (दि.7) उद्यान विभागातील कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजार रूपयांची लाच घेताना सहाय्यक उद्यान निरीक्षकाला एसीबीने रंगेहाथ पकडले. या तीन कारवायावरून प्रशासकीय राजवटीत पालिकेत कशा प्रकारे कारभार सुरू आहे, हे यावरून दिसून येत आहे. नगरसेवकांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. प्रशासकीय राजवटीत त्यात काहीच बदल झाला नाही.
…तरी हव्यास सुटेना
महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार आहेत. इतरही सर्व सुविधा दिल्या जातात. तरी लाचखोरीचा हव्यास मात्र सुटत नाही. यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अनेकदा कारवाया होऊनही कित्येकांना रंगेहाथ पकडले आहे. महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. तरीही या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भीती वाटत नाही.
ठाण मांडून बसलेले अधिकारी
पालिकेतील एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या नाहीत. अधिकारी अथवा कर्मचारी एकाच विभागात ठाण मांडून बसल्यामुळे ते संबंधित विभागात मनमर्जीप्रमाणे काम करतात. यातूनच खाबूगिरीचे प्रमाण वाढते. उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान निरीक्षक पाच ते सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी सुरू असलेल्या जूनमध्ये बदल्या करण्याचे स्पष्ट केले असले तरी बदल्या होतीलच, हे सांगणे कठीण आहे.