काबूल – अफगाणिस्तानात तालिबानने देशाच्या पश्चिम भागातील फराह प्रांतात 340 राजकीय कैद्यांची सुटका केली आहे. आणखी 40 कैद्यांना मध्य उरुझगान प्रांतात सोडण्यात आले, असे शमशाद न्यूज ब्रॉडकास्टरच्या वृत्तात म्हटले आहे. सर्व अफगाणिस्तानच्या कारागृहातून राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश तालिबानचा नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने गुरुवारी दिल्यानंतर या कैद्यांची सुटका करण्यात आली.
अफगाणिस्तानच्या तुरुंगांमध्ये मोठ्या संख्याने तालिबानी हस्तकांचा समावेश होता. तालिबानला सहकार्य केल्याबद्दल अफगाणिस्तानच्या सरकारने शेकडो जणांना अटक करुन तुरुंगात टाकले होते.
या तालिबानी हस्तकांच्या सुटकेसाठी तालिबानने अफगाण सरकारकडे आग्रह धरला होता. तालिबानबरोबर वाटाघाटी सुरू असताना तालिबानने कैद्यांच्या आदला बदलीचा पर्याय ठेवलेला होता. सरकारने काही तालिबानींना सोडल्यावर तालिबानच्या ताब्यातील सरकारी अधिकाऱ्यांना सोडण्याची तयारीही तालिबानने दर्शवली होती. मात्र तालिबानने आपला शब्द न पाळल्यामुळे सरकारने या तालिबानी हस्तकांची सुटका केली नव्हती.